आमच्या मंडळाबद्दल
१९८९ पासून भक्ती, सेवा आणि समुदायाचा प्रवास


स्थापना: १९८९
आमचा इतिहास आणि ऐतिहासिक प्रवास
माऊलीप्रसाद मित्र मंडळाची स्थापना १९८९ मध्ये झाली. या उत्सवाची सुरुवात ३८ वर्षांपूर्वी एका अत्यंत छोट्याशा खोलीत झाली. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी होत्या; पावसाळ्यात पत्र्याचे छत गळायचे, तेव्हा बाप्पाच्या मूर्तीवर पाण्याचा एकही थेंब पडू नये म्हणून सर्व कार्यकर्ते रात्रभर छत्री धरून पहारा देत उभे राहायचे. काळ पुढे सरकला, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि बाप्पाचे स्थान आधी सोसायटीच्या गच्चीवर आणि नंतर प्रशस्त प्रांगणात हलवले गेले.
सुरुवातीच्या काळात मंडप उभारण्यापासून ते विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीपर्यंतचे प्रत्येक काम कार्यकर्ते स्वतः रात्र-रात्र जागून करायचे. बदलत्या काळासोबत प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाढल्या, त्यामुळे आज जरी सर्व कामे स्वतः करणे शक्य नसले, तरीही 'ॐ साई डेकोरेटर्स' यांनी ही जबाबदारी तितक्याच प्रेमाने आणि यशस्वीपणे सांभाळली आहे.
“हा ३८ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास म्हणजे गणरायाचा आशीर्वाद, संस्थापक आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांची अखंड मेहनत आणि भाविकांनी दिलेल्या अतुलनीय प्रेमाची अथांग पावती आहे. गणरायाची ही कृपाछाया अशीच अखंड राहो, हीच चरणी प्रार्थना!”
दोन शब्द · अध्यक्षांचे मनोगत
“सर्वप्रथम बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक वंदन करून माऊली प्रसाद मित्र मंडळाच्या वतीने सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची समृद्ध परंपरा मंडळाने नेहमीच जतन केली आहे. ज्येष्ठांचे अमूल्य मार्गदर्शन, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, नागरिकांचे सहकार्य आणि देणगीदारांच्या विश्वासाच्या बळावर रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी आणि समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडत आहेत. परंपरेचा सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि नव्या विचारांचा स्वीकार करत ही वाटचाल अखंड सुरू राहील. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो, हीच प्रार्थना!”
आमची दृष्टी
आधुनिक प्रगती स्वीकारताना पारंपारिक मूल्यांमध्ये रुजलेला समाज निर्माण करणे.
आमचे ध्येय
भव्यतेने गणेशोत्सव साजरा करणे आणि सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाला योगदान देणे.

